न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विरोधी पथकामार्फत फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दुर्गानगर ते थरमॅक्स चौक या ठिकाणी ४२ पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि बी.आर.टी. रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉटेल्स, दुकाने, टपऱ्या अशा एकूण ६७२५० चौ. फुट इतक्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशान्वये क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सीताराम बहुरे, अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणात कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्या उपस्थितीत अ, क, ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
याकामी पथक बीट निरीक्षक, पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उप निरीक्षक, १०० पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १२५ कर्मचारी यांच्यासह ३ जे.सी.बी, १ पोकलेन, १ क्रेन आणि इतर वाहने तैनात होती. अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना नागरिकांनी स्वत:हून दुकानातील सामान काढून घेत सहकार्याची भूमिका घेतल्याने संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली.


















