- पालिकेच्या पदोन्नती समिती सभेत आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी मकरंद निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट पिटशनमध्ये झालेल्या निर्णयानुसार, रामचंद्र जुंधारे यांची सहशहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांना १ जून २०२२ पासून पदोन्नती देण्यात येणार आहे. तसा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज जारी केला आहे.
महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील हे महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महापालिकेतील स्थानिक अधिकारी की, शासननियुक्त बाहेरचा अधिकारी नियुक्त होणार, यासाठी चढाओढ सुरू होती. सेवाज्येष्ठतेनुसार बांधकाम परवानगी व अतिक्रमण विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यावर निर्णयासाठी आज गुरुवारी (दि. २६) रोजी पालिकेत पदोन्नती समिती सभा आयुक्तांनी आयोजित केली होती. त्यानुसार आयुक्तांनी १ जूनपासून मकरंद निकम हे शहर अभियंतापदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत शहर अभियंता हे महत्त्वाचे प्रशासकीय पद मानले जाते. आजवर या पदावर सर्वाधिक काळ स्थानिक अधिकारी नियुक्त झाले आहेत. आपलीच वर्णी लागावी यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चुरस होती. महापालिका आकृतीबंधानुसार त्यांच्या जागी स्थापत्य विभागाच्या अनुभवी व पात्र अधिकाऱ्याला संधी मिळाली आहे.