न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिका नारळ, पाम झाडाच्या झावळ्या तसेच नारळ काढण्यासाठी सहाशे रुपये शुल्क आकारणार आहे. या झाडांच्या झावळ्या तसेच, नारळ पडून वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे ती झाडे मुळासह काढण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सातत्याने तक्रारी येत आहेत.
झाड न तोड़ता, त्या झाडाचे जतन व्हावे म्हणून झावळ्या व नारळ काढण्यासाठी पालिका एका झाडासाठी ६०० रुपये शुल्क आकारणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. पाम व नारळ्याच्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच्या मोठमोठ्या झावळ्या तसेच वजनदार नारळ खाली पडतात. त्यामुळे खाली असलेल्या वाहने व इतर साहित्याचे नुकसान होते.
ते नुकसान टाळण्यासाठी झाडे पूर्णपणे काढण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. ती झाडे वाचविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचे संवर्धन व जतन होण्यासाठी त्या कामासाठी उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाकडून झाडावर चढणारे कुशल कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या झाडाचे जतन व संवर्धन होणार आहे.














