न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रोमा सेंटरशेजारील जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला यापूर्वीच देण्यात आली होती. त्याठिकाणी २७ गाळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र ही जागा कमी पडत असल्याने फूल बाजाराशेजारील ५८० चौरसमीटरचा भूखंड बाजार समितीला पाच वर्षांसाठी भाड्याने देण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीला पिंपरीतील क्रोमा सेंटर शेजारील भूखंड यापूर्वीच भाड्याने देण्यात आला आहे. त्याठिकाणी फूलबाजारासाठी २७ गाळे बांधण्यात आले आहे. याठिकाणी शहराच्या आजू – बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी सुविधा झाली आहे. तसेच याठिकाणी फूल खरेदीसाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी असते. दिवसेंदिवस बाजारामध्ये गर्दी होत असल्याने बाजार समितीला ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने १२ एप्रिलला फूलबाजारा शेजारील भूखंड देण्याची मागणी केली होती.
समितीच्या अर्जाचा विचार करून तसेच मोकळ्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी ही जागा समितीला देण्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. त्यानुसार ५८०.१४ चौरस मीटरचा भूखंड समितीला पाच वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांची सोय होणार आहे.














