- पवना नदीत थेट येणारे नाल्यांचे पाणी रोखण्यास होणार मदत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- ड्रेनेजद्वारे थेट सांडपाणी पवना नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीतील पाण्याला दुर्गंधी येत आहे. पर्यायाने येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. नदीत थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी म्हणून महापालिकेकडून इंटरसेप्टर सिव्हर लाइन (सांडपाणी नलिका) टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. पवनेत २० नाल्यांद्वारे मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
शहरात दररोज ३१२ दशलक्ष लिटर इतके सांडपाणी तयार होते. १४ मैलाशुद्धीकरण केंद्रामार्फत प्रक्रिया करून हे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते. मात्र, अद्यापही १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही
सह – शहर अभियंता रामदास तांबे म्हणाले, पवना नदीत नाल्यांद्वारे थेट मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्याचे काम केले जात आहे. पवना नदीत नाल्यांद्वारे थेट मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तसेच, हे सांडपाणी मैलाशुद्धीकरण केंद्रांकडे वळविले जाणार आहे. केंद्रांमध्ये त्यावर प्रक्रिया करून त्यानंतर हे सांडपाणी नदीपात्रात सोडले जाईल.
सहशहर अभियंता (पर्यावरण) संजय कुलकर्णी म्हणाले, पर्यावरण विभागामार्फत पवना नदीच्या दोन्ही काठांना इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. ऑक्टोंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. पवनेत २० नाल्यांद्वारे तर इंद्रायणीत ५ नाल्यांद्वारे मिसळणाऱ्या सांडपाण्यावर त्यामुळे प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.


















