- म्हणाले… शिवसैनिकांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले याचा त्यांना गुलाल उधळू द्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. भावनिक होताना ते म्हणाले. बहुमत चाचणीचा कोर्टाचा निर्णय मला मान्य आहे. राज्यपालांचे आभार त्यांनी चोवीस तासांच्या आत चाचणीचा निर्णय दिला. तेवढाच तातडीने निर्णय राज्यपालांनी प्रलंबित आमदारांच्या यादीवर दिला तर बर होईल.
लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे धन्यवाद. कॉंग्रेस बाहेरून पाठींबा देण्यास तयार आहे. सुरत, गुवाहाटीमधून बोलण्यापेक्षा समोर येऊन बोला. केंद्र सरकार निमलष्करी दलाची तुकडी मुंबईत पाठवतेय. शिवसैनिकांनी उद्या कुठलाही गोंधळ घालू नये. आमदारांच्या मार्गात कोणी येणार नाही.
कोणाकडे किती बहुमत यामध्ये मला रस नाही. मी सर्वांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करीत आहे. विधानसभा सदस्यत्वाचाही मी राजीनामा देत आहे. फक्त शिवसेनेची धुरा सांभाळणार आहे. शिवसैनिकांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले याचा त्यांना गुलाल उधळू द्या. गुळाच्या ढेपिला चिकटून बसणारा मी नाही. उद्या बंदोबस्तामध्ये कुणाच रक्त सांडेल त्या पापाचा मला धनी व्हायचं नाही. मला पुन्हा यायचंय असं मी म्हंटलोच नव्हतो. त्यामुळे मी पुन्हा यायचा प्रश्नच नाही.














