- सत्तेचे समीकरण बदलल्याने अनुकूल प्रभाग रचनेसाठी भाजप आग्रही?…
- तसे झाल्यास महापालिका निवडणूक थेट नवीन वर्षातच होणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२२) :- सत्ता समिकरणांच्या परिणामातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहे. यावेळी त्यांचा पारंपारिक मित्र पक्ष शिवसेनेऐवजी शिवसेनेतीलच बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची शिंदेसेना भाजपच्या कळपात सामील झाली आहे.
महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ओबीसी आरक्षणाचा तोडगा काढण्यासह भाजपकडून प्राधान्याने १४ महापालिकांसाठीची निश्चित करण्यात आलेली तसेच भाजपला अडचणीची ठरलेली तीन सदस्यांची प्रभाग रचना बदलली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही प्रक्रीयेसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाऊन महापालिकांच्या निवडणूका जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत पुढे जाऊ शकतात, असा अंदाज महालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. प्रभाग रचना पुन्हा चारची केल्यास त्याच थेट फटका महाविकास आघाडीला बसणार असून भाजपचा महापालिकेतील सत्तेचा मार्ग सुकर होऊ शकतो.
राज्यात अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका चुरशीच्या होणार होत्या. महापालिकेच्या मागील निवडणूका चारच्या प्रभाग रचनेनुसार झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाल्याने या वर्षी होणाऱ्या निवडणूका तीनच्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय राज्यावर सत्ता असलेल्या महाविकास आघाडीने घेतला होता . त्यानंतर प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसून आले.
हा वाद सुरू असतानाच, न्यायालयानेही ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरविले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ओबीसी आरक्षणासाठी डेटा संकलीत करण्याचे काम सुरू होते. हे काम महापालिका निवडणूका जाहीर होण्यापूर्वी पूर्ण करून न्यायालयात आरक्षण टिकविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. मात्र, शिवसेनेत झालेल्या धक्कातंत्रामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच कोसळलं आणि संपूर्ण नियोजनालाच तडा गेला.


















