- पाणी कपातीबाबत आयुक्तांचा निर्णय महत्वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- पवना धरणात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर १२ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपातीचे नियोजन महापालिकेने केले आहे. ज्या उपनगरांमध्ये एक तास पाणी सुरू आहे. तिथे एकच तास पाणी राहणार असून, ज्या भागात तीन किंवा चार तास पाणी पुरवठा आहे. तिथे एक तास पाणी कपात केली जाणार आहे. पावसाने ओढ दिल्यास पाणी कपातीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरीस पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी पवना धरण परिसरात आज अखेरपर्यंत ५०० मि.मी. पाऊस पडला होता. मात्र यावर्षी केवळ ७० मि.मी.पाऊस पडला आहे. त्यामुळे पाऊसच कमी असल्याने किंवा पाऊस लांबल्यास कपातीचे संकट शहरावर येऊ शकते. त्यादृष्टीने आढावा बैठक झाली. पाणी कपातीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत आयुक्त निर्णय घेतील, अशी माहिती श्रीकांत सवणे सह, शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग, महापालिका यांनी दिली.
असे होईल नियोजन…
सध्याचा दिवसाआड पाणीपुरवठाच कायम राहणार आहे. ज्या भागात चार तास, तीन तास पाणीपुरवठा होता. त्या भागात तीन आणि दोन तास पाणीपुरवठा होणार आहे. तर एक तास पाणीपुरवठा असणाऱ्या भागात बदल केला जाणार नाही. पवना धरणात १२ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी आहे. त्यामुळे नागरिकांनाही जपूनच पाणी वापरावे लागणार आहे. पाणीगळती रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.















