न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या विविध सवलतींचा तब्बल दोन लाख मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे. या मिळकतधारकांनी ३० जूनअखेर महापालिका तिजोरीत २५० कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी गुरुवारी (दि. ३०) दिली.
पिंपरी – चिंचवड शहरात ५ लाख ७८ हजार मिळकर्तीची नोंद आहे. गेल्या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने ६२५ कोटींचा कर वसूल केला होता. मात्र, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी १ हजार कोटी रुपयांचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुसार पहिल्या तीन महिन्यात तब्बल २५० कोटींची वसूली करण्यात या विभागाला यश आले आहे. कर संकलन विभागाने या वर्षीपासून अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. थकबाकी नसल्याचा दाखला, महिला, दिव्यांग, पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायटी अशा अनेक सवलती ऑनलाइन अर्जाद्वारे दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा ऑनलाइन कर भरणा करण्याकडे कल वाढला आहे; तसेच पर्यावरणपूरक निवासी सोसायट्यांना सामान्यकरामध्ये जवळपास १० टक्केपर्यंत सवलत दिली गेल्यामुळे पालिकेला त्याचा ऑनलाइन कर भरण्यामध्ये उपयोग झाला आहे.
एकूण दोन लाखांपैकी जवळपास १ लाख ३० हजार मालमत्ताधारकांनी ३० जूनपूर्वी आपला मिळकतकर ऑनलाइन भरला आहे. यावर्षी १ हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर संकलन विभाग प्रयत्न करीत आहे. सर्व बाराही सेवांचा लाभ नागरिकांना ऑनलाइन मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. मालमत्ताकर विभागाच्या सर्व सेवा पारदर्शी, जबाबदारीचे प्रतीक, प्रतिसादशील व वेगवान पद्धतीने देता याव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तीस जूनपूर्वी आगाऊ मिळकतकर भरणा सवलतीचा तसेच, ऑनलाइन भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले होते. ३० जूनला जवळपास दोन लाख नागरिकांनी आपला संपूर्ण वर्षाचा मिळकतकर कर भरला आहे. एकूण २५० कोटींचा भरणा झाला आहे, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.















