- ” इथं केवळ शत प्रतिशत कमळाचाच बोलबाला ”; भाजपच्या पांडाभाऊ सानेंचा विरोधकांना इशारा..
- वाढदिवसानिमित्त प्रभागात जोरदार शक्तीप्रदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- ” आमचे नेते महेशदादा लांडगे मला आगामी महापालिका निवडणुकीत ज्या प्रवर्गातून उमेदवारी देतील तिथून मी किंवा माझी सौभाग्यवती आम्ही लढण्याचा निर्णय घेऊ. दादांनी उमेदवारी नाही दिली तरीही मी एक सच्चा जनसेवक म्हणून नागरिकांची कामे करीतच राहील. हा खटाटोप निवडणुकीसाठी नाही. प्रभागातील नागरिक आणि माझी माणसं यांच्या आग्रहात्सव माझा वाढदिवस साजरा केला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे माझ्या मोरेवस्ती भागात भयानक परिस्थिती होती. माझ्यासह माझं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असताना जीवाची पर्वा न करता माझ्या प्रभागातील माणसांची काळजी घेतली. बेड, इंजेक्शन, बिलांसाठी वेळप्रसंगी डॉक्टरांशी भांडलो. कोरोना काळात महेशदादांच्या माध्यमातून गरजूंसाठी लाखांची रुग्णवाहिका घेतली. अन्नदान उपक्रम राबविला, गोळ्या औषधांपासून ते रेशन किट वाटले. यात गाववाला की बाहेरचा असा भेदभाव कधीच केला नाही. मात्र, आज केवळ निवडणुकीसाठी उगवणारे बुजगावणे पैशांच्या जीवावर माझ्या प्रभागातील नागरिकांना खरेदी करायला निघालेत. त्यांच्या मतांचा बाजार मांडायचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या धनदांडग्यांना निवडणुकीत माझी माणसं अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. इथं केवळ शत प्रतिशत कमळाचाच बोलबाला असेल ”, असा इशारा पांडभाऊ साने यांनी विरोधकांना दिला.
सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त चिखली मोरेवस्ती येथील जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात स्नेहमिलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी साने यांनी शक्तीप्रदर्शन करीत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. याप्रसंगी आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू तथा टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांडगे, टाळगाव चिखलीचे माजी उपसरपंच यशवंत साने, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक, राजकीय वर्ग, महिला वर्ग, कार्यकर्ते आणि समस्त साने परिवार तसेच प्रभागातील जवळपास पाच हजार नागरिकांनी भर पावसात कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून पांडाभाऊंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. समर्थकांनी ” पांडाभाऊ साने तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”, अशा घोषणा दिल्या.
पांडाभाऊ यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रभागातील नागरिकांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केली. प्रभाग तुटला तरी प्रभागाची नाळ पांडाभाऊ यांनी तोडली नाही. गत पालिका निवडणुकीत पराभूत होऊनही न खचलेला माणूस म्हणजे पांडाभाऊ आहेत. कोरोना काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. आताही एकाच नाही तर तीन प्रभागाची तहान ते भागवतयेत. ड्रायव्हर नसेल तर त्यांच्या पत्नी आणि नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रूपालीताई साने या ट्रक्टर चालवून आदर्श निर्माण करीत आहेत. समाजकार्यात साने कुटुंबाने स्वतःला झोकून दिलंय. मागच्या वेळेस चुक झाली. यावेळेस ती चुक दुरुस्त करू. प्रभागातील सर्व नागरिक पांडाभाऊच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.