- आरोग्य, आकाशचिन्ह, नागरी सुविधा, झोपडपट्टी आदी विभागांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाज वाटपात आणि विभागात बदल करण्यात आला असून आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे कार्यभार सोपवले आहेत.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आयुक्त पाटील यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त सचिन ढोले यांच्याकडे पूर्वी अतिक्रमण निर्मूलन विषयक कामकाज आणि पशुवैद्यकीय विभागाची जबाबदारी होती. आता त्यांच्यावर आकाशचिन्ह व परवाना विभागाची अधिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आस्थापना आकाशचिन्ह व परवाना विभागात असणार आहे.
समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे आता आरोग्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांची आस्थापना आरोग्य विभागात असणार आहे. उपआयुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे दक्षता व गुणनियंत्रण, माहिती व तंत्रज्ञान आणि नागरी सुविधा केंद्र हा विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांच्यावर या विभांगासोबत क्रीडा विभागाची अधिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना माहिती व तंत्रज्ञान विभागात असणार आहे. सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाचा कार्यभार देण्यात आला होता तसेच स्वच्छ सर्वेक्षण कामकाजासाठी ते समन्वयक म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्यावर माहिती व जनसंपर्क विभागासोबत समाज विकास विभागाचा अधिकचा कार्यभार नव्याने सोपविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांची आस्थापना माहिती व जनसंपर्क विभागात असणार आहे. सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे या क्रीडा विभागाचा कार्यभार पाहत होत्या. आता त्यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागात असणार आहे. सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे करसंकलन आणि आकाशचिन्ह परवाना विभागाचा कार्यभार देण्यात आला होता आता त्यांच्याकडे करसंकलन विभाग कायम ठेवत अभिलेख विभागाचा नव्याने कार्यभार सोपविण्यात आला आहे.
महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी १ ऑगस्ट २०२२ पासून आरोग्य विभागाचा कार्यभार स्विकारावा तसेच सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडील झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभाग सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्याकडील झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाचा पदभार निरस्त करण्यास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी ६ जुलै २०२२ पासून करण्यात आली आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.