- पालिकेच्या योजनेतून वर्षभरात वाचविला एवढा टॅक्स…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी कार्यान्वित व झिरो वेस्ट राबविणाऱ्या पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायटीतील ५ हजार ९९१ सदनिकाधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या सदनिकांना सामान्यकरात विविध कर सवलतीपोटी वर्षभरात एकूण ३२ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. तर, ३ हजार ३४९ सदनिकाधारकांकडून ३० जूनअखेर ४ कोटी ५ लाख रुपयांचा कर पालिका तिजोरीत जमा झाला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात निवासी व बिगरनिवासी ५ लाख ७८ हजार मिळकतींची नोंद आहे. आतापर्यंत दोन लाख मिळकतधारकांनी २६० कोटी रुपयांची बिले भरली आहेत. शहरातील २४ हाऊसिंग सोसायट्यांसह १०७ जणांनी पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायटी व बंगला असल्याबाबत पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये ५ हजार ९९१ सदनिका व व बंगले आहेत. या सर्व पर्यावरणपूरक मिळकतींना ३२ लाख रुपयांची सवलत पालिकेने दिली आहे.
पर्यावरणपूरक मिळकतींना ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा (ओला कचरा पूर्णतः जिरविणे) ५ टक्के, एसटीपी कार्यान्वीत असल्यास ३ टके, ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा व एसटीपी कार्यान्वित असल्यास ८ टक्के, झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत असल्यास (ओला व सुका कचरा पूर्णतः जिरविणे) ८ टक्के, झिरो वेस्ट व एसटीपी कार्यान्वित असल्यास १० टक्के अशा सवलती महापालिका देत आहे.
पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी करसंकलन विभाग प्रयत्न करीत आहे. अशा सोसायटींची नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून पर्यावरणपूरक सोसायट्यांतील ६ हजार सदनिकांनी नोंदणी केली आहे. पर्यावरणपूरक सोसायट्यांसाठी वर्षभर सवलत योजना उपलब्ध आहे. सोसायट्या पर्यावरणपूरक करून, या योजनेचा लाभ हाऊसिंग सोसायट्यांनी घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.