- लाभार्थ्यांचा जीव टांगणीला; आंदोलनाचा प्रशासनला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :-पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत चिंचवड लिंक रोड येथे उभारण्यात आलेल्या दोन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतीमध्ये २२४ सदनिका आहेत. या सदनिकांची शुक्रवार (दि. ८) रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र, महापालिकेने ही सोडत ऐनवेळी रद्द केली. त्यामुळे लाभार्थ्यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे कार्यालय गाठत सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देऊन आजच्या आजच सोडत काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या जेएनएनयूआरएम वतीने योजनेअंतर्गत चिंचवड, लिंक रोड ए आणि बी अशा दोन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतीमध्ये प्रत्येकी ११२ याप्रमाणे २२४ सदनिका आहेत. येथील सदनिकांसाठी शुक्रवार (दि. ८) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र, ही सोडत अचानक रद्द झाल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये कोणताही बदल करू नये. आमच्या मागणीनुसार संगणकीय सोडत न काढल्यास ती आम्हाला मान्य नसून महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा लाभार्थ्यांच्या वतीने देण्यात आला.
झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचा पदभार गुरुवारीच स्वीकारला आहे. या विभागाची मला अजून माहिती घ्यायची आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार शुक्रवारी होणारी सदनिकांची संगणकीय सोडत रद्द करण्यात आली आहे. लवकरच या सदनिकांसाठी सोडत काढण्यात येईल.
– सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन विभाग…