- गोरगरीब कष्टकरी फेरीवाल्यांची पालिकेनी मांडलीयं चेष्टा..
- फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा अन्यथा जनआंदोलन; बाबा कांबळेंचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :- चिखलीतील घरकुल येथे नुकतेच लाभार्थ्यांना पालिकेकडून गाळे वाटप करण्यात आले. मात्र, कोणत्याही पायाभूत सुविधा न दिल्याने दुसऱ्याच दिवशी पावसामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. स्मार्ट सिटीमध्ये करोडो रुपयांचा चुराडा करणारे पालिका प्रशासन दुसरीकडे गोर-गरिबांना सापत्नपणाची वागणूक देत आहे. जिथे जनावरही व्यवस्थित राहू शकत नाही, अशा ठिकाणी हॉकर्स झोन विकसित करून पालिकेने गोरगरीब कष्टकरी, मागासवर्गीय फेरीवाल्यांची चेष्टा केली आहे, असा आरोप टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे.
२००५ पासून आम्ही फेरीवाल्यांसाठी संघर्ष सुरू केला आहे. २००७ मध्ये फेरीवाल्यांचा पहिला कायदा मंजूर करून घेतला. परंतु हा कायदा नेमका काय आहे? त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत? फेरीवाल्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने केले पाहिजे? त्यासाठी कोणकोणत्या सुविधा असल्या पाहिजे? याबद्दल सर्व या धोरणामध्ये तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्याची अधिकारी अंमलबजावणी करत नाहीत.
मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॉकर्स झोन पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा. अन्यथा फेरीवाल्यांच्या वतीने मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.