न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२२) :- बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात सायलेन्सर बदलून कानठळ्या बसविणारा आवाज काढणारे बुलेटस्वार रडारवर आहेत.
वाहनात बदल केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यापुढे अशा बुलेटस्वारांवर गुन्हे दाखल करून त्यांची बुलेट जप्त करण्यात येणार आहे. त्यासोबतच सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेजवाल्यांनाही यात सहआरोपी करण्यात येणार आहे.
बेशिस्त वाहन चालकांकडून शहरात वायू, तसेच ध्वनिप्रदूषण करण्यात येते. त्यासोबतच त्यांच्यामुळे वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलीस अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. वाहनांना आरसा नसणे, काळ्या काचा, वाहनाच्या मूळ स्वरूपात बदल करणे, अशा विविध कारणांसाठी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. त्यासोबतच वाहन चालकांकडून दंडही वसूल केला जात आहे. त्यासाठी चौकांमध्ये वाहन तपासणी करण्यात येत आहे.