- निवडणूक कामकाजासाठी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या लवकरच नेमणुका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमले जाणार आहेत. त्यांच्याकडे निवडणुकी संदर्भातील कामकाज असणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या त्रिसदस्यीय प्रभागरचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २३ जूनला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर ८ हजार १४७ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. अंतिम मतदार यादी शनिवारी (दि. १६) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यासाठी आयोगाने निवडणुकी संदर्भातील सूचना केल्या आहेत. आयुक्त हे निवडणूक अधिकारी असणार आहेत. चार ते पाच प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी राहणार आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार नाही. मागील तीन वर्षांपासून तो एकाच पदावर कार्यरत नसावा. अधिकाऱ्यांना योग्य व पुरेसे प्रशिक्षण दिले पाहिजे. विशिष्ट अधिकाऱ्यांच्या वारंवार नियुक्त्या करू नयेत, अशा आयोगाने महापालिकेस सूचना दिल्या आहेत.
तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. नियमानुसार कामकाजात मदत करणे, मतदान केंद्रांची पाहणी करणे, योग्य त्या सुविधा पुरविणे, मतदान व मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, साहित्य वाटप करणे, संकेतस्थळ अपडेट करणे, उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे अपलोड करणे, बातम्या व इतर माहिती अपलोड करणे, आदी कामे ते करणार आहेत. आचारसंहिता कक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असणार आहे. उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा हिशोब तपासण्यासाठी एक कक्ष असणार आहे. ते काम लेखाधिकारी वर्ग एकच्या अधिकाऱ्यास दिले जाईल. निवडणूक अधिकारी आयुक्तांचे संपूर्ण निवडणूक कामकाजावर नियंत्रण असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व इतर अधिकारी व कर्मचारी हे आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करतील.


















