- पालिका कर्मचाऱ्यांना पुन्हा ड्रेसकोडची सक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुजरात राज्यातील सुरत महापालिकेप्रमाणे गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार असून, दैनंदिन कामकाजास गती येणार आहे. ड्रेसकोडवरून कर्मचारी कोणत्या विभागाचा आहे, हे स्पष्ट होणार आहे.
महापालिकेचे वर्ग १ ते ४ मध्ये सुमारे ७ हजार ५०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी व कर्मचारी कोणत्या विभागाचे आहेत. त्यांच्या ड्रेसवरून स्पष्ट होत नाही. विभाग अ.ब.क.ड. अशा वर्गानुसार अधिकारी कर्मचा-यां ना ड्रेसकोड असावा, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांचे मत आहे.
महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सोईस्कर ठरणारा ड्रेसकोड कसा असावा, हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच सुरत महापालिकेचा दौरा करून आले आहे. सुरतला भेट दिलेले शिष्टमंडळ आयुक्त पाटील यांच्यासमोर अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार अ, क आणि ड वर्गानुसार व विभागानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड निश्चित केला जाणार आहे. त्या ड्रेसकोडनुसारच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे कामाची शिस्त वाढून दैनंदिन कामकाजास गती येणार आहे. कोणत्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत ते ओळखणे सुलभ होणार असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. तसेच ड्रेसकोडमुळे कामाच्या वेळेत बाहेर फिरणारे कर्मचारी ठळकपणे दिसून येतील.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड असावा, असे नियोजन आहे. अहवाल लवकरच आयुक्तांकडे सादर केला जाईल.
– चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त…