न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- शहरामध्ये शिक्षण हक्क गरीब कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत २ हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर ५७८ जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. या जागा भरण्यासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून वारंवार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यानंतरही अर्ज करण्यासाठी विद्यार्थी पुढे न आल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत.
शहरातील शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. निवड यादीतील सोडत काढल्यानंतर ६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यासाठी प्रथम २० एप्रिलपर्यंत मुदत होती. त्यानंतर ही मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण न झाल्याने १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
‘ आरटीई ‘ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी एकूण ३ हजार २५५ जागा रिक्त होत्या. त्यापैकी निवड यादीतील २ हजार २३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, प्रतीक्षा यादीतील ७५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात यश मिळाले. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तीन फेऱ्या राबविण्यात आल्या. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आरटीई अंतर्गत एकूण १०४ शाळांमध्ये ३ हजार २५५ जागा होत्या. या जागांसाठी ५ हजार ५८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. २१८ विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी प्रवेश नाकारण्यात आले.