न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- दापोडी येथील महापालिकेचा पवना नदी किनारा भागातील मैलाशुद्धीकरण प्लांट गेली काही दिवसांपासून बंद आहे. याचबरोबर तुटलेले चेंबर यामुधून होणारी गळती यामुळे पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी जात असल्याने दुर्गंधीसह नदीप्रदुषणात भर पडत आहे.
गेली आठवडाभर मोठा पाऊस व नदीला असलेले प्रवाही पाणी यामुळे नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र, पावसाच्या उघडीपीनंतर येथील चेंबर मधून होणारी गळती, बंद असलेल्या मैलाशुद्धीकरण प्रक्रिया यामुळे नदी किनारा भागातील रहिवाशी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
गेली अनेक दिवसांपासून येथील दुरुस्तीचे कामे संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दापोडी प्लॅंटच्या बाजूला अंदाजे साठ फुट लांब तर चाळीस फूट खोल खोदकाम करण्यात आलेले आहे. या भागात घाण पाणी साचून राहत आहे. या खोदकामामुळेच येथील ट्रान्सफॉर्मर खचला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील दुरूस्तीचे काम सुरू असून तात्काळ येथील दुरूस्त्या करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
येथील ट्रान्सफॉर्मर खचला होता. येथील काम तातडीने सुरू आहे. त्यापुर्वी येथील प्लॅंट बंद राहिल्याने सांगवी प्लॅंटमधून प्रक्रिया सुरू होती.
– संजय कुलकर्णी, मुख्य समन्वय अधिकारी ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय…