- लाचखोरीच्या प्रकरणानंतर पालिकेला आली जाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी – चिंचवड पिंपरी महापालिकेमध्ये गेल्या एक वर्षामध्ये तब्बल तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्यात महापालिकेतील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बुधवारी महापालिकेतील सर्व्हेअरवर कारवाई झाल्यानंतर आता एकाच विभागात तीन वर्षापेक्षा जास्त काळ काम करत असलेल्या सर्व्हेअरची बदली करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या विभागांमध्ये १९ सर्व्हेअर आहेत. त्यामध्ये नगररचना विभागात ८, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण ५, भूमी व जिंदगी विभाग ५, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन स्थापत्य १ असे १९ सर्व्हेअर आहेत. एका विभागामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यास दुसऱ्या विभागात बदलीचा नियम आहे मात्र याचे पालन प्रशासन विभागाकडून होत नाही. तीन वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात राहूनही अनेक सर्व्हेअरच्या बदल्या झाल्या नाहीत. त्यामध्ये नगररचना विभागामधील आठ सर्व्हेअरपैकी चार सर्व्हेअर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात व एकच जबाबदारी सांभाळत आहेत. तर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामध्ये पाच सर्व्हेअरपैकी तीन सर्व्हेअरना तीन वर्षाहून अधिक काळ झाला. मात्र त्यांचीही बदली केली नाही तर भूमी आणि जिंदगी विभागामध्ये एक सर्व्हेअर नवीन आहे. उर्वरित चारही सर्व्हेअरला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत.
एकाच विभागात जास्त काळ काम करणाऱ्या सर्व्हेअरच्या बदल्या करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांच्या मान्यतेने एका विभागातून दुसऱ्या विभागात सर्व्हेअरच्या बदल्या केल्या जातील.
– बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, प्रशासन विभाग…