न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- पिडीत महिलेला विनाकारण मारहाण करत आरोपीने हप्त्याची मागणी केली. यावेळी महिलेने तू मला का मारहाण करत आहेस व काल तू माझ्या दाजीलाही का मारले? अशी विचारणा केली असता, आरोपीने मी इथला भाई आहे.
मी रोज असे कोणालाही मारतो तसे तुझ्या दाजीला मारले. तूला ही धंदा करायचा असेल तर मला महिन्याला हप्ता द्यावा लागेल. नाही तर तुला व तुझ्या दाजींना जिवंत सोडणार नाही म्हणत महिलेला कोयत्याचा धाक दाखविला. तसेच, महिलेच्या पर्समधून ७ हजार रुपये काढून नेले. हप्ता चालू कर नाहीतर, तुला भोसरीत धंदा करु देणार नाही अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. ७) सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान लांडेवाडी जवळ घडली.
रुपेश सुरेश पाटील (वय ३० रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर खंडणी, मारहाण, विनयभंगाचा तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.