- मास्को शहराच्या मधोमध अण्णाभाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याचं होणार अनावरण..
- अभिनंदनाचा ठराव सभाग्रहात पारित करा; अमित गोरखे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- मॉस्को-रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फोर फॉरेन लिटरेचर (Maragarita Rodomino All Russia State Library for Foreign Literature) या जगप्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने महाराष्ट्राच्या भूमीचे महान सुपुत्र साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेतली आहे. संस्थेच्या जगप्रसिद्ध प्रांगणामध्ये अगदी मास्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्या सोबत अण्णाभाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचे योजिले आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रातील काही मंत्री, भारतासह जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे मॉस्कोमध्ये होऊ घातलेले हे अनावरण म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा मोठा गौरव आहे. महाराष्ट्राची शान आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्याच्या सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करावा, अशी मागणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र भूमीचे महान सुपुत्र साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष कोरोनाच्या कठीण काळात जोमाने साजरे करता आले नाही. तत्कालीन राज्य सरकारने जन्मशताब्दी सोहळ्यासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा केली होती. परंतु अंमलबजावणी होऊ शकली नाही. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा, कर्तत्वाचा आणि भारत-रशिया संबंधांमध्ये दृढीकरणाच्या दृष्टीकोनातून ही अभिमानास्पद बाब आहे. मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मास्को, रशिया यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याची उभारणी केली. त्यानिमित्त मी या संस्थेचे अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करतो. राज्य सरकारने देखील सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडून अण्णाभाऊंच्या कार्याला नव्याने उजळा द्यावा, असे या निवेदनात गोरखे यांनी म्हटले आहे.












