न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर आरोपीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो आणि त्यांचे नाव वापरले. आयुक्तालयाच्या वेबसाईटवरून शहर तसेच पिंपरी – चिंचवड पोलीस पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यावरून काही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या नावाने मेसेज केला.
आरोपी हा पोलीस आयुक्त असल्याचे भासवून पैसे मागण्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांना मेसेज करीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित आरोपीने इंटरनेटवरून माझा फोटो घेतला. त्या फोटोचा त्याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलसाठी वापर केला. त्यानंतर काही सहायक पोलीस आयुक्तांना व्हॉट्सअॅपवरून ‘ हाय ‘ म्हणून मेसेज केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तसेच आरोपी निष्पन्न झाला असून, गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. सायबर सेलचे पोलीस अंमलदार कृष्णा गवळी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. गुरुवारी (दि. १८) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.