न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोचे दोन्ही मार्ग मार्च २०२३ पर्यंत सर्व काम पूर्ण होऊन १०० टक्के क्षमतेने सुरू होतील, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी विश्वास व्यक्त केला. याचबरोबर महामेट्रो पुण्यामध्ये ४६ किलोमीटर मेट्रो व ३६ किलोमीटर मेट्रो निओ अशा ८२ किलोमीटरच्या विस्तारित मार्गावर काम करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनी पुणे व पिंपरी – चिंचवड अशा दोन्ही मार्गावर मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल दोन्ही शहरांमधील नागरिकांप्रती डॉ. दीक्षित यांनी आभार व्यक्त केले.
मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे तसेच मेट्रोचे अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट येथील कार्यालयात डॉ. दीक्षित यांनी पत्रकारांना मेट्रोच्या कामकाजाची माहिती दिली. डॉ. दीक्षित म्हणाले, मार्च २०२३ पर्यंत मेट्रोच्या दोन्ही मार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. भुयारी मार्ग सुरू होण्याला त्यापेक्षा थोडा जास्त कालावधी लागू शकतो.
स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी या सध्याच्या मार्गाचाच एक भाग असलेल्या या दोन्ही मार्गांचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट ते खडकवासला, हडपसर ते फुरसुंगी, लोणीकाळभोर, हडपसर ते खराडी, असे ४६ किलोमीटरचे विविध प्रस्तावित मार्गांच्या अहवालांवर महामेट्रोकडून काम सुरु आहे. तसेच महापालिकेच्या एचसीएमटीआर या ३६ किलोमीटरच्या वर्तुळाकार मार्गावर महामेट्रो मेट्रोनिओ या रस्त्यावरून ट्रामप्रमाणे धावणाऱ्या गाडीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे .


















