- झोपडपट्टीमुक्तीसाठी पालिकेचे सर्वेक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करणे आणि खऱ्या झोपडीधारकांना हक्काचे घर उपलब्ध करून देणे, याशिवाय पर्याय नाही. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुढाकाराने पिंपरी – चिंचवडमधील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये झोपडीधारकांची माहिती घेऊन घरांवर संबंधित नंबर दिले जातात. त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रकल्पात घर कसे मिळणार ? हा प्रमुख मुद्दा आहे. दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी शहरातील झोपडपट्टी धारकांच्या हिताच्या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे.
खऱ्या झोपडीधारकांचे नुकसान झोपडपट्टीमुक्त शहर आणि गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे, हीच प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, सर्वेक्षणाला विरोध करण्याची भूमिका काही नागरिकांकडून घेतली जात आहे. ज्याला कायदेशीर काहीही आधार नाही. काही व्यक्तींनी झोपड्यांमध्ये आठ – दहा जागा ताब्यात घेऊन पक्क्या झोपड्या थाटल्या आहेत. झोपडीचा ताबा आहे. काही जणांनी झोपड्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. सर्वेक्षण आणि पुनर्वसन प्रकल्पाबाबत प्रशासन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.
भोसरीतील खंडेवस्ती येथे साडेचार एकरमध्ये सुमारे ७०० झोपड्या आहेत. त्यांचे पुनर्वसन नियमाप्रमाणे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ७५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवली आहे. त्याआधारे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. त्याला काही जणांनी विरोधाची भूमिका घेतली. हक्काचे घर आणि अन्य पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
– राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण…