न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २२ फेब्रु.) :- मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या वतीने येत्या शनिवारी (दि. २३) रोजी ‘स्टूना २०१९’ या एकदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) च्या सभागृहात ही परिषद होणार आहे.
या परिषदेचे आयोजन करण्याचा मान यंदा एनआयपीएमच्या पुणे विभागाला मिळाला असून, ‘संधींचे नवे राजमार्ग-सहस्त्रकांसाठी वृद्धिचे सोपान’ (New Vistas of Opportunities – Growth Ladder for Millenials) ही या परिषदेची मुख्य संकल्पना असणार आहे. देशभरातील विविध व्यवस्थापन विद्याशाखेतील विशेषतः एमबीए एच. आर. विभागाचे एक हजार विद्यार्थी- विद्यार्थिनी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून एन एम एस एच आर सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. नागराज यांची उपस्थिती असणार आहे.
थरमॅक्स कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष शरद गांगल, एसीसी व नोव्हारटिस कंपनीचे माजी वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ. नरेंद्र मेहरोत्रा, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लि. चे नरेश कुमार पिनिशेट्टी, एम्क्युअर फार्मास्युटिकलचे मनुष्यबळ व्यवस्थापकीय अध्यक्ष प्रशांत पराशर, ज्येष्ठ व्यवस्थापन सल्लागार कुलदीप जोशी, स्ट्रॅटेजिक बिझनेस भारत फोर्ज लि. चे अध्यक्ष व संचालक कृष्णकुमार श्रीनिवासन यांसारखे नामवंत व्याख्याते या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विशेष उल्लेखनीय बाब ही कि या नामवंत वक्त्यांसोबत तीन विद्यार्थी व्याख्यातेही असणार आहेत.
विद्यार्थी दशेतच उद्योग जगताची ओळख व्हावी आणि विद्यार्थ्यांनी त्यानुसार स्वतःला विकसित करावे या हेतूने ही विद्यार्थी परिषद आयोजित केल्याचे एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्र व उद्योग जगतातील प्रतिनिधी या परिषदेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत आहेत. या कार्यक्रमाला पन्नासहुन अधिक विविध नामांकित औद्योगिक आस्थापनांचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारीही विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असणार आहेत. अशी माहिती परिषेदेचे समन्वयक डॉ. एस.व्ही. भावे यांनी दिली.











