- सर्व्हेक्षणात तब्बल दोन लाख नऊ हजार वाढीव बांधकामांचा शोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- शहरात प्लॅन पास घर असताना वाढीव बांधकाम करून महापालिकेचा करोडो रुपये टॅक्स चुकवणा-या तब्बल दोन लाख नऊ हजार नवीन मिळकती निदर्शनास आल्या आहेत. सॅटेलाइट इमेजद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात या नवीन मिळकती नोंद करण्यात आल्या असून त्यांच्याकडून कर आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
महापालिकेच्या हद्दीत एक लाखाहून अधिक अनधिकृत बांधकामांची संख्या आहे. पालिकेकडे बांधकामांच्या नोंदी आहेत. मात्र, अनधिकृत अतिरिक्त बांधकाम केलेल्या मिळकतधारकांच्या नोंदी नव्हत्या. ही वाढीव बांधकामे शोधून काढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाद्वारे सॅटेलाइट फूट प्रिंटच्या सहायाने शहराच्या विविध भागात सव्हें करण्यात आला.
पिंपरी – चिंचवड महापालिका भवन, पिंपरी गाव, निगडी प्राधिकरण, आकुर्डी, थेरगाव आदी भागात हे सर्व्हेक्षण करण्यात आले. उर्वरीत शहरात डिसेंबर २०२२ अखेर सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात तब्बल दोन लाख नऊ हजार वाढीव बांधकाम केलेल्या मिळकती आढळून आल्या आहेत. त्यातील काही मिळकतधारकांनी मूळ मिळकत कर वेळेवर भरलेला आहे मात्र, वाढीव बांधकामांवर लागणारा अतिरिक्त कर भरणा केला नसल्याची माहिती समोर आली आहे. या मिळकतधारकांकडून वाढीव बांधकामांची कर आकारणी केल्यास निश्चितच पालिकेच्या उत्पन्नात होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून देण्यात आली.
क्षेत्रफळांच्या नोंदीसाठी पुन्हा सर्व्हेक्षण…
माहिती व तंत्रज्ञान विभागाद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातील माहितीचा आधार घेऊन कर संकलन विभागाला प्रत्यक्ष मिळकतींना भेटी देऊ वाढीव बांधकामांच्या क्षेत्रफळाची नोंद करून घ्यावी लागेल. त्यानुसार संबंधित मिळकतधारकाकडून नियमानुसार लागणा-या कराची आकारणी करावी लागेल. त्यामुळे मिळकत करात निश्चितच वाढ होईल, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.