- शहर एकदाही पहिल्या दहामध्ये नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या क्रमवारीत सुधारणा झाली नाही. शहराचा देशात १९ वा क्रमांक कायम आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील शहराची परिस्थिती ‘ जैसे थे ‘ आहे. दरम्यान, राज्यात सिटीझन फीडबॅकमध्ये (सर्वोत्तम नागरिक अभिप्राय) शहराचा चौथा क्रमांक आला आहे. ‘ स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ‘ चा शनिवारी (दि. १) दिल्ली येथे निकाल जाहीर झाला. सर्वोत्तम नागरिक अभिप्रायात १० लाख ते ४० लाख लोकसंख्येच्या विभागात देशातील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने पिंपरी – चिंचवडला गौरविण्यात आले.
सरकारच्या वतीने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागात पिंपरी-चिंचवड शहर सहभागी झाले होते. व्यापक स्वरूपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे, नागरिकांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. पिंपरी चिंचवड शहरात एप्रिल – मे या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान राबविण्यात आले होते. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरू करून स्वच्छतागृह मोहीम प्रभावीपणे कार्यान्वित केली होती. ओला, सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला. जनजागृतीवर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.
सात वर्षापासून शहराचा आलेख चढता – उतरता
सन २०१६ मध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. तर, २०१७ मध्ये शहर थेट ७२ व्या क्रमांकावर फेकले होते. २०१८ मध्ये थोडी सुधारणा होत ४३ व्या क्रमांकावर आला. पुन्हा २०१९ मध्ये शहराची घसरण झाली आणि ५२ क्रमांक आला. २०२० मध्ये सुधारणा होत २४ वा क्रमांक आला. २०२१ मध्ये आणखी सुधारणा होत १९ वा क्रमांक आला. २०२२ मध्येही १९ वा क्रमांक आला आहे.
सात वर्षांत शहर एकदाही पहिल्या दहामध्ये आले नाही.
रंगरंगोटी व इतर बाबींसीठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली मात्र, तरीही शहराच्या रैंकिंगमध्ये सुधारणा झाली नाही. २०२१ प्रमाणे यंदाही देशात शहराचा १९ वाच क्रमांक आला आहे. तर, राज्यात चौथा क्रमांक आला आहे. गतवर्षी पाचवा क्रमांक होता.
















