- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या बैठकीत आयुक्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरातील सर्व मिळकतींचे जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत २ लाख ३२ हजार मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच लिडार यंत्राद्वारे ९७ टक्के सर्व्हे झाला आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि. २९) झालेल्या शहर सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.
बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्प कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले.
शेखर सिंह म्हणाले की, जीआयएस सर्वेक्षणांतर्गत डोअर टू डोअर सर्वेक्षण सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या संबंधित विभागांचा सहभाग करून घेण्यात येत असून, नागरिकांसाठी प्रकल्प खुले करण्यात येणार आहेत. म्युनिसिपल ई – क्लासचे ४० टक्के काम झाले आहे.
















