- ‘सोसायटीधारकांशी संवाद’ सभेत अजित पवारांचा मनोदय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रमाण वाढले असून, सोसायटीधारकांना विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. सोसायट्यांमध्ये अंतर्गत वादही आहेत. या समस्या सोडविण्यासाठी ‘तंटामुक्त गाव’ अभियानाच्या धर्तीवर ‘तंटामुक्त सोसायटी’ अभियान शहरांमध्ये प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवडमधील सोसायट्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काळेवाडीतील ‘सोसायटीधारकांशी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.कार्यक्रमाला शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची निवेदने पवार यांच्याकडे सादर केली.
पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सोसायट्यांचे प्रमाण जास्त आहे. सोसायटीधारक नियमितपणे कर भरतात. सोसायटीतील अंतर्गत कामांचा खर्च तेच करतात. तरीही सोसायटीधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सोसायटीमध्ये सदनिका घेतल्यावर सदनिकाधारकांमध्ये मालकी वृत्ती वाढते. काही जणांना आपण सोसायटीचे मालकच झाल्यासारखे वाटते. कुत्रा-मांजर पाळण्यावरून हमखास वाद होतात. वाहने लावण्यावरून; तसेच मुलांच्या खेळण्यावरून भांडणे होतात, असे पवार यांनी सांगितले. एकाच मेळाव्यात सर्व प्रश्न सुटणार नाही. सोसायटीधारकांच्या समस्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरी भागातील प्रश्नही वाढले आहेत.