न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम घेतली. मात्र, या मोहिमेला नागरिकांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये फक्त १ हजार ५७३ जणांनी अवैध नळजोड अधिकृत करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले. त्यामुळे आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दिवाळीनंतर शहरातील अवैध नळजोड धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
शहरात ५ लाख ७९ हजार मिळकतींची नोंद होते. मात्र, त्या तुलनेत अधिकृत नळजोड सुमारे पावणेदोन लाखच आहेत. दुसरीकडे शहरात अवैध नळजोड धारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केल्याने पाण्याची गळतीहोते. तसेच, दूषित पाणीपुरवठाही होत याचा परिणाम विस्कळीत पाणीपुरवठ्यावर होतो. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळ अवैध नळजोडाचे सर्वेक्षण केले आहे. अवैध नळजोड नियमितीकरणासाठी सवलत जाहीर केल्या. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्नही अतिशय कमी आहे. त्यामुळे महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यांची विशेष मोहीम राबविली. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी ५ हजार रुपये आकारण्यात आले. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखले होते मात्र, त्यानंतरही अवैध नळजोड अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. यामध्ये निवासी भागातून ७७० तर झोपडपट्टी भागातून ८०३ असे १ हजार ५७३ जणांचे अर्ज आले आहेत. शहराला गेल्या पावणेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. आंद्रा धरणातील वाढीव १०० एमएलडी पाणी येण्याचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे शहरवासीयांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तीन महिन्यांची विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा विभाग आता चांगलाच सक्रीय झाला आहे.
अवैध नळधारकांना नियमित जोडणी घेण्यासाठी संधी दिली होती. त्या मोहिमेला मुदतवाढही देण्यात आली होती. तरीही ज्यांनी नियमित नळ जोडणी घेतली नाही, त्यांच्यावर दिवाळी झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. – अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका…















