न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- सध्या समाजातील २० टक्के मुलांमध्ये काही ना काही मानसिक आजाराची लक्षणे आढळून येत आहे. मुलांमध्ये वाढत असलेला मानसिक आजार ही सामाजिक समस्या बनत आहे. पालकांनी वेळ काढून मुलांसोबत संवाद साधत त्यांच्या मानसिक आजाराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ आदित्य पाटील यांनी केले.
तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलच्या वतीने “लहान मुलांचे मानसिक आजार” या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. शाळेचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, संचालिका स्मिता नायर- कुरुप, मुख्याध्यापिका क्षमा गर्गे आदी पालक उपस्थित होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग, फ्लॅट संस्कृती, पालक-मुले यांच्यातील नात्यात आलेला दुरावा या कारणाने मुले मानसिक आजाराला बळी पडत आहे. चिडचिड करणे, एकटे राहणे, रात्री जागरण करणे, भूक न लागणे, रडू येणे, स्वतःसोबत बडबड करणे, काळजी न घेणे, अभ्यासातील प्रगती कमी होणे ही सर्वसाधारण मानसिक आजाराचे लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत.
आपली मुले मानसिक आजाराला बळी पडू नयेत, यासाठी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यातील आजार ओळखून मुलांना मानसोपचारतज्ज्ञ व मनोविकारतज्ज्ञकडे नेवून उपचार करून घ्या. मुलांसोबत वेळ घालवा, मुलांवर कोणत्याही अपेक्षांचे ओझे न लादता विनाअट त्यांचा स्वीकार करा. मुलांच्या भावना ओळखा, त्यांना सन्मान द्या. मुलांसोबत मैदानी खेळ खेळा. पालकांनी मुलांसाठी एक आदर्श बनावे. पालक व मुले यांच्यातील संबंध सुदृढ करावेत, असा सल्ला पालकांना दिला.
यावेळी स्मिता नायर यांनी शाळेतील घडत असलेल्या दुर्घटना व व्यसनाधीनता याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपा भसिन यांनी मानले.











