- पिंपरी चिंचवड शहर शिवसेनचा बुरुज ढासळला; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ;
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश..
- कामगारांच्या हितासाठीच खऱ्या बाळासाहेबांच्या पक्षात प्रवेश – इरफानभाई सय्यद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२२) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचे आणि पक्षातील जुने-जाणते दिग्गज नेतृत्व इरफानभाई सय्यद यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथील टेंबी नाका येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज रविवारी (दि. १३) रोजी शिवसनेच्या बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरफान सय्यद यांचे पक्षात जोरदार स्वागत केले आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अल्पसंख्याक चेहरा म्हणूनही सय्यद यांच्याकडे पाहिले जात असल्यामुळे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारीही इरफान सय्यद यांना देण्यात आली आहे. कामगार चळवळीतील शिवसेनेचं असामान्य नेतृत्व म्हणून इरफान सय्यद यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ मानलं जात होतं. पण त्यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इरफान सय्यद यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी इरफान सय्यद यांनी शिंदेंच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. परंतु ते आमच्या पक्षातील नेते आणि हितचिंतक देखील होते, त्यामुळे त्यांची भेट घेतल्याची सरवासारव त्यावेळी सय्यद यांनी केली होती. परंतु ते शिंदे गटात सामील होतील अशी सुतराम शक्यता कोणालाच नव्हती. इरफान सय्यद यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत युवकांची मोठी फौजही शिंदे गटात सामील होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचा बुरुज ढासळू शकतो, अशी शक्यता आहे.
इरफान सय्यद हे राज्याच्या कामगार सल्लगार समितीचे सदस्य, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे नेते इरफान सय्यद यांनीही पक्षाची साथ सोडल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा पराभव पत्करावा लागू शकतो, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
” महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षापासून पुणे जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील माथाडी, मापाडी, बांधकाम कामगारांचे प्रश्न शासन दरबारी पटलावर मांडले. त्यांच्या समस्यांचे निवारण केले. कामगारांची ताकद शिवसेनच्या मागे उभी केली. परंतु आम्ही सत्तेत असताना देखील कामगारांच्या हितासाठी अनेक योजना शासनाकडे सुचवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी खऱ्या बाळासाहेबांच्या पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात सत्तेत असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी भरीव मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ”
– इरफान सय्यद, कामगार नेते… ”
















