न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरु असून समन्वयाचा अभाव असल्यामुळे कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. नव्याने रुजू झालेल्या प्रशासन अधिकारी यांचा त्यांच्या अधिकार व नियंत्रण कक्षेतील कर्मचारी वर्गावर वचक व विश्वास नाही. त्यामुळे २ जून २०१८ रोजी पालिकेत प्रतिनियुक्तीवर रुजू झालेल्या प्रशासन अधिकारी यांना राज्यसेवेत परत पाठवण्यात यावे, अशी मागणी शिक्षण समिती सदस्या अश्विनी चिंचवडे यानी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.
शिक्षण समिती स्थापन झाल्यानंतर प्रशासन अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, पटवृद्धीसाठी नाविन्यपूर्ण प्रस्ताव शिक्षणसमिती सभेपुढे आणणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत एकही प्रस्ताव विषयपत्रिकेवर आलेला नाही. पहिल्याच मिटिंगमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्याचा ऐनवेळी सदस्य प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
प्रशासन अधिकारी यांनी माध्यमांसमोर उत्साहाने कारगिल विजय दिवस महापालिका शाळांमध्ये साजरा होईल हे सांगितले. परंतु प्रत्यक्षात किती शाळांमध्ये कारगिल विजय दिवस साजरा झाला? त्या त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समितीचे, पालक समितीचे सदस्य कुठे कुठे उपस्थितीत होते ? याबाबत प्रशासनाने कोणतेही उत्तर दिलेले नाही.
पदाचे अधिकार व कर्तव्य बजावण्यापेक्षा सर्व अधिकार अतिरिक्त आयुक्तांना आहेत एवढेच सांगतात. शिक्षण समिती मिटिंग मध्ये झालेल्या चर्चा व
सुचनांचे मिनिट्स त्यावर कोणती कार्यवाही केली हा चिंतनाचा विषय आहे.
वास्तविक प्रशासन अधिकारी यांनी महिन्यापूर्वी विषयपत्रिकेवर शिक्षक दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडावयास हवा होता, परंतु दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षकदिन साजरा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने विषयपत्रिकेवर न ठेवल्यामुळे ऐनवेळी सदस्य प्रस्तावाद्वारे शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी ५ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. प्रशासन अधिकारी यांनी ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाचा कार्यक्रम होईल, या दृष्टीने कोणतीही कार्यवाही केली नाही.
शिक्षण समिती समोर त्यांनी आजपर्यंत एकही शैक्षणिक विषय, प्रस्ताव आणला नाही याचाच अर्थ त्या प्रशासन अधिकारी या पदास न्याय देण्यास सक्षम नाहीत असे सिद्ध होते. लोकप्रतिनिधींच्या पत्रास उत्तरे दिली जात नाहीत तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची या काय दखल घेणार?
त्यामुळे आयुक्तांना या स्मार्टसिटीचे विद्यार्थी खरोखरच स्मार्ट बनवायचे असतील तर या पदावर अनुभवी, कार्यशील, कृतीशील, शिस्तप्रिय असे शिक्षण प्रशासन अधिकारी राज्य सरकारकडून मागवावेत, अशी मागणी चिंचवडे यांनी पत्रकाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे, विनया तापकीर, उषा काळे आदी उपस्थित होते.
















