- डिंपल आणि यशस्वीच्या अर्धशतकांच्या समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- डिंपल आणि यशस्वी वाघमारे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर जय हिंद हायस्कूलने न्यु पुणे पब्लिक स्कूलवर दणदणीत विजय मिळवला. क्रिकेट स्पर्धेत प्रियदर्शनी स्कूलच्या भाविका अहिरेने अष्टपैलू कामगिरी कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील क्रिकेट खेळाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या गटातील सामने पार पडले. जय हिंद स्कूल पिंपरी विरुध्द न्यु पुणे पब्लिक स्कूल या सामन्यामध्ये जय हिंद स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना जय हिंद स्कुलच्या वतीने डिंपल ने ७० धावा केल्या तर यशस्वी वाघमारे हीने ५४ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर जय हिंद स्कूलच्या संघाने १४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात न्यु इंग्लिश स्कूलने लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ ३८ धावाच केल्या. जय हिंद स्कूलच्या शर्वरीने दोन षटकात चार धावा देत तीन बळी मिळवले. जय हिंद स्कूलच्या रुही सिंग सात धावा देऊन २ बळी घेतले.
प्रियदर्शनी स्कूल इंद्रयाणीनगरच्या भाविका अहिरे ही १७ वर्षाखालील मुलींच्या गटात जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत झळकली असून तीने ८३ धावांसह अष्टपैलू कामगिरी करत स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक व्यक्तिगत धावसंख्या करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. प्रियदर्शनी स्कूल इंद्रयणीनगर विरुद्ध डॉ.डी. वाय. पाटील पब्लिक स्कूल असा सामना रंगला. या सामन्यात डॉ.डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलने प्रियदर्शनी स्कूलवर मात केली. भाविका अहिरे हीने केलेल्या दमदार ८३ धावांच्या जोरावर प्रियदर्शनी स्कूलने ११४ धावांचे लक्ष्य उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना डी. वाय. पाटील स्कूलने अडखळत सुरुवात केली. सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी सामना शेवटपर्यंत नेला आणि संघर्षपूर्ण विजय मिळवला. डी. वाय. पाटील स्कूलच्या वतीने सिद्धी राणे २४ धावा आणि सई शिंगटे १७ धावा यांनी संयमी फलंदाजी केली. प्रियदर्शनी स्कूल भाविका अहिरे या गोलंदाजाने दोन षटकात नऊ धावा देत दोन बळी टिपले तसेच डी. वाय. पाटील स्कूलच्या सई शिंगटे हीने दोन षटकात अठरा धावा देत दोन बळी मिळवले.
विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल टाटा मोटर्स विरुद्ध प्रतिभा ज्युनिअर कॉलेज क्रिकेट सामन्यात विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल विजयी ठरला आहे. विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलने दिलेल्या ९१ धावांचे आव्हान पेलताना प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला केवळ ७४ धावाच करता आल्या. विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने श्रावणी पारिट ३९ धावा तसेच वीणा सूर्यवंशी २३ धावा या खेळाच्या जोरावर ९१ धावांचे लक्ष्य ठेवले. बदल्यात प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने ७४ धावाच केल्या. अनुष्का डहाळे ४४ धावा आणि वैष्णवी पावसकर १६ धावा वगळता इतर कोणत्याही खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या समीक्षा जमदाडे या गोलंदाजाने दोन षटकात आठ धावा देत दोन गडी बाद केले. विद्यानिकेतनच्या हर्षदाने दोन षटकात सतरा धावांच्या बदल्यात दोन गडी टीपले. याबाबत स्पर्धा प्रमुख अरुण कडूस आणि ऐश्वर्या साठे यांनी माहिती दिली.
















