न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २८ फेब्रु.) :- जागतिक विज्ञान दिनानिमित्त कुदळवाडीतील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक ८९ येथे आज गुरुवार (दि. २८) रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिकेच्या नगरसेविका अश्विनी जाधव व स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव तसेच संतोष जाधव, मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयोगाची मांडणी केली.
अश्विनी जाधव म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवून त्यांच्यामध्ये जिज्ञासा, कुतूहल व चौकसबुद्धी जागृत करुन, उद्याचा भारताचा संशोधक निर्माण होवू शकतो.
दिनेश यादव यांनी कुदळवाडी शाळेमध्ये नियमित विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे विकसित केले जाते, असे सांगितले.
संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक करुन, विद्यार्थ्यांनी चौकस राहून, प्रत्येक लहान घटनेचे चिकित्सकपणे विश्लेषण केले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांकडून त्याची कारणे समजून घेतली पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयोगाची मांडणी केली.











