न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२२) :- काही दिवसांपूर्वी तरुणाच्या आईचे निधन झाले होते. याचा मानसिक धक्का त्या तरुणाला बसला. आईच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या तरुणाने घराचा दरवाजा लावून घेत स्वतःला कोंडून घेतले. त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. यामुळे त्याला अशक्तपणा आला होता. आसपासच्या नागरिकांनी त्यांना दरवाजा उघडण्यासाठी वेळोवेळी आवाज दिला. आतून प्रतिसाद आला मात्र दरवाजा उघडला नाही.
दरम्यान १५ दिवसानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अशक्तपणामुळे दरवाजा उघडता आला नाही. नागरिकांनी सोमवारी दुपारी ४.०५ वाजता अग्निशामक दलास माहिती दिली. त्यानुसार प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्राचे काशिनाथ ठाकरे (सिनियर फायरमन), अनिल माने (फायरमन), दिनेश पाटसकर (वाहन चालक) ऋषिकेश आव्हाड (ट्रेनि फायरमन), रोहित मांजरे (ट्रेनि फायरमन), सुशील पाटील (ट्रेनि फायरमन) यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
त्यांनी डोर ब्रेकरच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये दरवाजा तोडला. राजू निकाळजे (वय ४०, रा. ज्ञानदीप कॉलनी, मनपा शाळामागे, किवळे गावठाण) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे जवान अनिल माने यांनी दिली.
















