- शहरातील नागरिक व बांधकाम व्यावसायिकांना पालिकेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक व बांधकाम व्यावसायिक बांधकामाचा राडारोडा नदी, नाले, तळे, मोकळ्या जागा, रस्ता, पदपथ आदी ठिकाणी टाकतात. अशा नागरिकांना महापालिकेकडून दहापट दंड केला जातो. कोठेही राडारोडा न टाकता तो महापालिकेकडेच जमा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
बांधकाम करताना व जुने बांधकाम पाडताना तसेच, विकासकामे करताना बांधकाम राडारोडा तयार होतो. त्या राडारोड्यावर मोशी कचरा डेपो येथील केंद्रात प्रक्रिया करून बांधकामास वापराचे साहित्य तयार केले जाते. ते साहित्य २० टक्के कमी दराने उपलब्ध करून दिले जात आहे. ते केंद्र एसएसएन एनोव्हेटीव्ह इन्फा. एलएलपी ही ठेकेदार एजन्सी चालवित आहे. पालिकेस बांधकाम राडारोडा देण्यासाठी १८००-१२०-३३२१२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
त्या राडारोड्यात काँक्रीट, माती, स्टील, लाकूड, विटा आणि रेतीमिश्रीत सिमेंट या बांधकाम साहित्याशिवाय इतर कचरा मिसळू नये. बांधकाम राडारोडा उचलणे व मोशी केंद्रापर्यंत वाहून नेण्याचा खर्च १५ रूपये प्रति किलोमीटर व प्रति टनाचा खर्च आहे. तसेच, राडारोडा प्रक्रिया शुल्क २५० रूपये प्रति टन आहे. पालिकेच्या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधून, नागरिक किंवा बांधकाम व्यावसायिक शुल्क भरून आपला बांधकाम राडारोडा पालिकेकडे जमा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. अन्यथा एकूण शुल्काच्या दहापट दंड केला जाणार आहे.
















