न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- बोअरवेलचे बटण बंद करण्यासाठी गेलेल्या वीटभट्टी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २१) रात्री बोडकेवाडी, देहूगाव येथे घडली.
मोहित गणपती राजपूत (२०) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर, कुलदीपकुमार श्रीराजाराम (२०, रा. बोडकेवाडी, देहूगाव) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी जखमी कुलदीपकुमार यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वीटभट्टी मालक गणेश ऊर्फ किरण महादू बोडके (३१, रा. बोडकेवाडी, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलदीपकुमार आणि त्यांचा मित्र मयत मोहित हे दोघे बोडकेवाडी येथील वीटभट्टीवर काम करतात. दरम्यान, सोमवारी रात्री एकच्या सुमारास वीटभट्टीवरील काम संपवून दोघांनी अंघोळ केली. त्यानंतर मोहित बोरवेलचे बटन बंद करण्यासाठी गेला. त्या वेळी विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी हे मोहित याच्या शेजारी उभे होते. त्यामुळे ते देखील जखमी झाले. आरोपी गणेश बोडके यांनी कोणत्याही सुरक्षेच्या उपायोजना न करता निष्काळजीपणे इलेक्ट्रिक डीपी लावल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.
















