- ४०० कोटींचे काम पोहोचले तब्बल १२०० कोटींवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणामधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्याने त्यावर शासनाने बंदी घातली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. आयुक्तांनी राज्य शासनाला पत्र पाठविले असून पवना बंद जलवाहिनीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. प्रकल्प रद्द करायचा की पुढे न्यायचा याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याने बंद जलवाहिनीचा चेंडू आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम २००८ मध्ये सुरू केले होते. या प्रकल्पाच्या विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनावेळी गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘स्टे’ दिला आहे. त्यामुळे प्रकल्पासंबंधीचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. प्रकल्प रद्द करायचा की तो पुढे न्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागणार आहे. त्यासाठीच आयुक्त शेखर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पवना बंद जलवाहिनीबाबत काय करायचे आहे त्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती सिंह यांनी केली आहे. त्यामुळे पवना बंद जलवाहिनीचे भविष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून आहे.
पवना बंद जलवाहिनीचे काम पुन्हा सुरु करण्यासाठी पहिल्यांदा त्यावरील बंदी उठवण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर नव्याने निविदा काढायची की त्याच ठेकेदाराकडून काम करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, ४०० कोटीचे हे काम आता सुमारे १२०० कोटींपर्यंत गेले आहे. प्रकल्पावर बंदी आल्याने २०११ पासून प्रकल्पाचे काम बंद आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी आणलेले पाइप ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाला भाडेतत्त्वावर जमीन घ्यावी लागली आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. तर दुसरीकडे उघड्यावर पाइप असल्याने त्यांना गंज चढू लागला आहे.
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची माहिती घेतली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाला पत्र व्यवहार केला आहे. प्रकल्प पुढे न्यायचा की तो रद्द करायचा याचे अधिकार मुख्यमंत्री यांनाच आहेत. पिपरी चिंचवड महापालिका प्रशासक म्हणून प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छा आहे. सामंजस्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– शेखर सिंह, आयुक्त महापालिका…















