- अध्यक्षपदी अरुण बोऱ्हाडे तर स्वागताध्यक्षपदी संतोष बारणे यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- देहू-आळंदी परिसरातील साहित्यप्रेमी, रसिक ग्रामस्थांनी साहित्य, कला आणि मराठी भाषा संवर्धनासाठी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्या वतीने मोशी येथे एकदिवशीय इंद्रायणी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग औद्योगिक परिसर असल्याने जिल्ह्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यातही प्रज्ञा आणि प्रतिभा बहरत आहे. कामगारांतील अनेक साहित्यिक प्रसिद्धीपासून दूर आहेत. कामगार वर्गातील या प्रतिभावान साहित्यिकांचा गौरव म्हणून, ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांची या पहिल्याच इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. च-होली येथे इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, इतिहास संशोधक संदीप भानुदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी मांडलेल्या या प्रस्तावास, ज्येष्ठ साहित्यिक व लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे यांनी अनुमोदन दिले.
हे साहित्य संमेलन मोशी येथे शनिवारी (दि. २४) रोजी होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रा. तुकाराम पाटील, शिवाजी चाळक, राज अहेरराव आदी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यप्रेमी युवक सामाजिक कार्यकर्ते संतोष सिताराम बारणे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. अहेफाज मुलाणी यांनी मांडलेल्या या प्रस्तावास प्रा. विकास कंद यांनी अनुमोदन दिले.
















