बुरूड समाजाच्या प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे यांनी पत्रकाद्वारे या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे निवेदन पाठविले आहे. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे हे बुरूड समाजाचे भूषण आहेत. ते तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार म्हणून संसदेत जनतेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेणा-या काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणे हे आपले आद्यकर्तव्य समजून खासदार खैरे तेथे गेले. मात्र, अंत्यविधी दरम्यान काही आंदोलकांनी या ठिकाणी कोणत्याही राजकीय नेत्याने येऊ नये, असा पवित्रा घेत खासदार खैरे यांना धक्काबुक्की केली.
खासदार खैरे हे बुरूड समाजाचे एकमेव खासदार आहेत. राज्यात बुरूड समाजाची लोकसंख्या केवळ 11 लाख आहे. या घटनेने समाजबांधवांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे खासदार खैरे यांना धक्काबुक्की करणा-यांवर त्वरीत कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.
















