न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी प्रतिनिधी : केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या ४ वर्षांच्या अपयशी कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा आयोजित केली होती. पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृहात शुक्रवारी या जनसंघर्ष यात्रेची जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशनपासून नवी सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृहापर्यंत काॅंग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रेची पदयात्री काढण्यात आली.
सरकारने बेटी बचाआे, बेटी पढाआे असा नारा दिला. परंतू, सत्तेच्या धुंदीत हे लोक बेभान झाले आहेत. त्यातच भाजप आमदार राम कदम आता मुलींना पळवून नेण्याची भाषा करु लागले आहेत. लोकांना त्यांना मुली पळवुन घेवून जाण्यासाठी आमदार केलेय का? याचा विचार करायला हवा.
यापुर्वी पंढरपुरच्या आमदार प्रशांत परिचारकांनी सैनिकांच्या पत्नीचा अपमान केला, प्रदेशाध्यांनी शेतक-यांना शिव्या घातल्या. त्यामुळे जनतेला विचार करण्याची वेळ आली असून भाजपाचे आमदार राम कदम हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तसेच यापुढे भाजपापासून बेटी बचाआे असे म्हणण्याची वेळ आलीय, असा घणाघाती आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.
खासदार चव्हाण म्हणाले की, सरकार बहूमताच्या जोरावर विरोधकांचे एेकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे धोरण राबविले आहे. प्रसार माध्यमांना जाहिराती देवून आश्वासने लोकांना दिली. ती आश्वासने पाळली नाहीत. त्यातील 99 टक्के जाहिराती बोगस निघाल्याने हे सरकार फसवे सरकार असल्याची धारणा जनतेची झाली आहे.
स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियातून देशात, राज्यात किती गुंतवणूक झाली. दरवर्षी 2 कोटी लोकांना नोक-या दिल्या का?, जीएसटी, नोटाबंदीने भारतात सर्वाधिक बेकारी वाढली. निव्वळ लोकांना खोटी आश्वासने द्यायची, भुलथापा मारण्याचा उद्योग ही मंडळी करीत आहेत. देशाचा जीडीपी वाढल्याचे हे भाजपचे लोक सांगताहेत, पण गॅस, डिझेल, पेट्रोल वाढल्याचे दिसू लागलेय,
देशात सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येवून निवडणूक आयोगाला पत्र दिलेय, यापुढे ईव्हीएम मशीनद्वारे नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी केलीय, जनतेतूनही तीच मागणी पुढे येत असल्याचे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारची नोटा बंदी पुर्ण फसली आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय, काळा पैसा काहीही बाहेर आलेला नाही. उलट नोटाबंदीने मोदीच्या मित्राचा काळा पैसा बॅंकामध्ये येवून तो पांढरा झाला आहे. मोदीच्या काळात कर्ज बुडव्याची संख्या वाढून तब्बल 11 लाख कोटी एवढी झालीय, विजय मल्ल्या, निरव मोदी हे कर्ज बुडवून परदेशात फरार झाले.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या काळात संविधान जाळण्यात आले. ही जनतेसाठी धोक्याची घंटा आहे. मोदी पुन्हा निवडून आले, तर लोकशाही जिवंत राहणार नाही. मोदीमुळे देशात संविधान शिल्लक राहणार नाही. मोदी हे तर एक हूकूमशहा झाले आहेत. लोकांना त्यांची भिती वाटायला लागली आहे. त्यामुळे प्रतिकुल परस्थितीत काम करुन घराघरात जावून लोकांचे मन परिवर्तन करुन पुन्हा जोमाने काॅंग्रेसची सत्ता आणूया असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, रत्नाकर महाजन यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भारत भालके, शरद रणपिसे, रत्नाकर महाजन, रुपाली कापसे, रेणूताई पाटील, शहराध्यक्ष सचिन साठे, पृथ्वीराज साठे, कैलास कदम, गिराजा कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले. तर सुंत्रसंचालन नरेंद्र बनसोडे यांनी केले.
















