न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दोन कोटी रोजगाराचे आश्वासन तरुण विसरले नाहीत….. विशाल वाकडकर
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी दि. 06 सप्टेंबर रोजी चिंचवड स्टेशन पासून चापेकर चौकापर्यंत पेट्रोल, डिझेल भाववाढ विरोधी आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांनी चार चाकी वाहन दोरी लावून ओढले. युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख, विजय लोखंडे, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, विनोद कांबळे, कुणाल थोपटे, मंगेश बजबळकर, प्रतिक सांळुखे, मयुर जाधव, राजेश कोकाटे, योगेश मोरे, प्रदिप गायकवाड, सुभाष हजारे, कविता खराडे, वर्षा जगताप, गंगाताई धेडे, सुनिल गव्हाणे, संगिता कोकणे, अमोल पाटील, रमणदिप सिंग कोहली, चैतन्य चोरडीया, आसिफ शेख आदी उपस्थित होते.
आंदोलनानंतर चापेकर चौकात झालेल्या सभेत राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी सांगितले की, युपीए सरकारच्या काळात 2014 साली क्रुड ऑईलचा दर 96 डॉलर प्रति बॅलर असताना पेट्रोलचा दर 68 रु. तर डिझेलचा 57 रु. प्रति लिटर होता. आता 2018 साली क्रुड ऑईलचा दर 70 डॉलर प्रति बॅलर कमी झाला असताना पेट्रोल 87 रु. डिझेल 75 रुपयांहून जास्त प्रति लिटर महाग आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जीएसटीसाठी चार, आठ आणि बारा टक्के असे स्लॅब ठरविले होते. भाजपाने यात बदल करुन आठ, बारा, चोविस आणि अडोतिस टक्क्यांचे स्लॅब जीएसटीमध्ये टाकले.
जीएसटीच्या वाढलेल्या स्लॅबमुळे आणि नोटाबंदीमुळे अन्यायकारक भाववाढ झाली. मोदी सरकार गरीबांच्या खिशावर दरोडा टाकून कर्च बुडव्या भांडवलदारांना मदत करीत आहे. सामान्य गृहीणींना कुटूंबाचा मासिक खर्च भागविणे अशक्य झाले आहे. देशात वार्षिक दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देशातील बेरोजगारी मिटवू असे पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन बेरोजगार तरुण अद्याप विसरलेले नाहीत. दोन कोटी रोजगार तर नाहीच पण नोटाबंदीमुळे आणि वाढीव जीएसटीमुळे आहे तेच रोजगार बंद झाले आहेत. अशी टिका वाकडकर यांनी केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी होत असताना भाजपा प्रणित केंद्र सरकार मात्र, नागरिकांच्या माथी पेट्रोल, डिझेलची भाववाढ लादत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रातील वाहतूकीचा खर्च वाढल्यामुळे बेसुमार भाववाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस जीएसटी अंतर्गत घेतला पाहिजे. कच्चा तेलाच्या दरानुसार पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी झाले पाहिजेत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली.
यावेळी ‘मोदी सरकारने लावला चुना, राष्ट्रवादीच येणार पुन्हा’, भाजप सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
















