न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत यंदाचा १७ वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना जाहिर झाला आहे.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक ९ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे. पुस्काराचे वितरण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून, जेष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्तात्रय (काका) साने आदी उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक,शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमारशर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण, पार्श्वगायक पद्म भूषण उदित नारायण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.


















