न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातून आंतरराज्य एसटी बसची अर्थात पिंपरी चिंचवड ते पणजी अशी शिवशाही बसची सुविधा (दि. २२) सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड ते पणजी ही बस सकाळी ९ वाजता आगारातून सुटली. प्रौढांना १०५५ रुपये तर मुलांसाठी ५३० रुपये तिकीट आहे. गोव्याला जाणाऱ्यांसाठी या बसमुळे सुविधा झाली आहे.
यासाठी आगाऊ आरक्षण पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.
राज्य परिवहन महामंडळ एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. त्यात सवलतीच्या दरात सहलीपासून ते देवदर्शनापर्यंतचा समावेश आहे. वल्लभनगर आगारातून आता पणजीला जाण्याची सुविधा झाली आहे. त्यामुळे गोव्याला जाणाऱ्यांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध झाली आहे.
















