- अडथळा ठरणारे रेल्वेचे ईएचव्ही मोनोपोल लवकरच हटविण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२२) :- रावेत येथील शिंदेवस्तीत उड्डाणपूल बांधण्याच्या कामास अडथळा ठरणारे ईएचव्ही मोनोपोल काढणे आवश्यक आहे. रेल्वे (पायलॉन) स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. तसेच, रेल्वेची विद्युत वाहिनीही स्थलांतरीत करावी लागणार आहे. त्या कामासाठी रेल्वे ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याकरिता पालिकेकडून ९४ लाख ३९ हजार ९७ रुपये शुल्क रेल्वे विभागास देण्यात आले आहे.
निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते किवळेच्या मुकाई चौकापर्यंतच्या बीआरटीएस मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने तो पूल अद्याप अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे त्या मार्गावरून पालिकेस बीआरटीएस सेवा सुरू करता आलेली नाही. परिणामी, थांबे वापराअभावी धूळ खात पडले आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे रावेत, शिंदे वस्ती येथील उड्डाणपुलास जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर पुलास अडथळा ठरणारे तेथील उच्चदाब विद्युतवाहक तारा व टॉवर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच, रेल्वेच्या उच्चदाब विद्युत वाहिन्या स्थलांतरीत क्रॉसिंगचे ४०० मिमी कंडक्टर ओढण्याचे काम करावे लागणार आहे. असे एकूण १२ कंडक्टर ओढावे लागणार आहेत. वीजपुरवठा खंडित करून हे काम तातडीने केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महापारेषण विभागाने रेल्वे विभागाकडे २७ सप्टेंबर २०२२ ला पत्र पाठविले होते. रेल्वेने त्यासाठी ८ डिसेंबर २०२२ च्या पत्रानुसार ९४ लाख ३९ हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पालिकेच्या विद्युत विभागाने ते शुल्क रेल्वेस अदा केले आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. रेल्वेने परवानगी दिल्यानंतर ते काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून घेतले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, उच्चदाब वाहिनी व टॉवर हटविणे व नवीन बनविण्याचा खर्च महापारेषण विभागास पालिका देणार आहे.
















