न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. ७ मार्च) :- भारतीय जनता पक्ष पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे यांच्या आकुर्डीतील जनसंपर्क कार्यालयात तिथीप्रमाणे संत गाडगे महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
यावेळी स्थानिक भाजप कार्यकर्ते वैजनाथ शिरसाठ, गणेश दातीर, संतोष तरटे, चंद्रकांत चव्हाण तसेच परिसरातील अबाल वृद्ध उपस्थित होते. कैलास कुटे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. सौ. मोनिका कुटे यांच्या हस्ते आकुर्डी परिसरात स्वच्छता करणाऱ्या महापालिका स्वछता महिला कर्मचारी सौ. रुक्मिणी व सौ. वाघमारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कैलास कुटे यांनी संत गाडगे महाराज यांचा जीवनपट थोडक्यात विशद करताना सांगितले की, ”आपण देखील छोट्या छोट्या गोष्टींची स्वछता करून, शारीरिक आरोग्यासोबतच, सामाजिक आरोग्य सुधारणा करू शकतो. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन, लहान मुलांना स्वच्छतेसंबंधीचे संस्कार करावेत”.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन गणेश काळभोर यांनी तर मेघा म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले.