न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- आज वर्षाचा शेवटचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थोडासा कालावधी राहिला आहे. येणारे वर्ष सुखसमृद्धी आणि आरोग्यसंपन्न जावे, तसेच नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी शहरवासीयांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषाचे वातावरण असते. गेले दोन वर्षे कोरोनामुळे बंधने असल्याने शहरवासीयांना नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करावे लागले; मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, शहरातील मॉल्स आणि गिफ्टची दुकाने सजली आहेत. तसेच हॉटेल्स, टूर, ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स दिल्या आहेत. नवीन वर्षासाठी नागरिक जास्त करून समुद्र किनारी जाणे पसंत करतात. त्यामुळे समुद्र किनारी जाण्यासाठी व मौजमस्तीसाठी नागरिकांची तयारी सुरू झाली आहे.
डीजेच्या तालावर नाचण्यासाठी तरुणाईची चढाओढ पहायला मिळणार आहे. नवीन वर्षानिमित्त सर्वजण मध्यरात्रीच्या १२ वाजण्याची वाट पाहत असतात. तोपर्यंत डान्स, गाणी यांचे आयोजन केले जाते. फक्त हॉटेल्समध्येच नाही तर उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये सोसायट्यांनी पार्टीचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ, भोजन, डीजे यांचे आयोजन केले आहे.
अनेक हॉटेल्समध्ये, सोसायट्यांमध्ये बॉनफायर पार्टीचे आयोजन केले आहे. थंडीमध्ये मध्यरात्रीपर्यंत शेकोटी पेटवून संगीत लावून त्याभोवती डान्स करून नववर्षाचे स्वागत केले जाते. यामध्ये सर्वजण सहभागी होतात. यामध्ये मनोरंजनाबरोबर खाद्य धमालदेखील केली जाते. डिसेंबर महिना म्हणजे मस्त थंडी असते. या थंडीत शेकोटी किंवा बॉनफायरची मजा काही औरच. शेकोटीच्या भोवती गाण्यांच्या भेंड्या, जुन्या आठवणींना उजाळा देत किंवा नवीन काही ठरवत आपल्या जीवलगांच्या सोबतीनं सरत्या वर्षाची शेवटची रात्र आणि नवीन वर्षाची पहाट वेगळाच आनंद देते.


















