हिंजवडी वाहतूक समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची केली मागणी !
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : वाकड उड्डाणपुल ते हिंजवडी फेज 3 पर्यंत होणाऱ्या वातुक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा याकरिता नगरसेवक मयूर कलाटे यांनी हिंजवडी आयटीचे पार्कचे जनक व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन पवारांनी कलाटे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिंजवडीचे मा.सरपंच सागर साखरे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.
कलाटे यांनी हिंजवडीत दररोज होणा-या वाहतूक कोंडीचा सामना नोकरदार, कारखानदार व स्थानिक रहिवासी या सर्वांनाच करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड व पुणे शहरच्या हद्दीवरच हिंजवडी इन्फोटेक पार्क विकसित झाला असून हिंजवडी मधील पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी स्थानिक पंचायतीसह राज्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची देखील आहे. हिंजवडीमधील वाहतुक कोंडीमुळे इंधन खर्चाबरोबर वेळही वाया जातो तसेच प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
याकरीता वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पवार साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एम.आय.डी.सी. वाहतुक पोलीस आधिकारी, पुणे व पिंपरीचे दोन्ही आयुक्त, आय.टी.पार्कचे प्रतिनिधी व हिंजवडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या शिष्टमंडाळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन कायमचा तोडगा काढावा अशी विनंती कलाटेंनी पवारांना केली आणि त्यांनी ती तात्काळ मान्यही केली.
त्यामुळे शरद पवार यांच्या दुरदुष्टीतून साकारलेल्या हिंजवडी आयटी हबमध्ये होणाऱ्या वाहतुक कोंडीवरील समस्या कायमस्वरुपी निकालात निघेल अशी आशा नगरसेवक मयुर कलाटे यांनी व्यक्त केली. तसेच हिंजवडी परिसरात काम करणाऱ्या आयटी वर्गाचा व हिंजवडी, वाकड, पिंपळे निलख, थेरगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, औंध या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोयही टळेल असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
















